Taliram

जमावबंदी मधे फलामृत शोधणाऱ्या हे तळीरामा
थांब! नको करू धाडस नाक्यावर उभा आहे पांडू मामा
दिशा दिशांना त्यांनी रचलाय तुझ्यासाठी सापळा
मुक्तपणे विहरताहेत फक्त चिमणी आणि कावळा
शत्रू जरी सूक्ष्म असला तरी तो महाबलाढ्य आहे
बंद केले देश आणि बंद प्रत्येक कारखाना आहे
पर्वा नाही त्याला की तू नेता आहे की अभिनेता आहे
सर्व सिमावरती आता फक्त एक त्याचा दरारा आहे
अमृताची बाटली तुला आता स्वप्नात दिसते का रे ?
कासावीस होतो जीव अन शरीरास भरते का कापरे ?
नको जाऊ बाहेर घेऊन तुझे कंपणारे कलेवर
थरथरत्या पावलांनी जमणार का चालणे मैलभर ?
फार दूरवर आहे खोपटातले पेड्रो चे अमृतालय
झिझवल्यास पायऱ्या त्याच्या, तेच तुझे देवालय
वाटेत जर भेटला तुला खाकी वर्दीतील अधिकारी
दंडुक्याचा होईल प्रहार तुझ्या जर्जर पार्श्व भागावरी
सहन नाही होणार वेदना, सूज काही उतरणार नाही
शांत हो तळीरामा, हेही दिवस काही राहणार नाही…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *