का थांबली मुंबई लोकल !

थांबणं तुला माहित नव्हतं, मेहनती तू खूप !
सुर्यानंतर तुझ्या शिस्तीचा दाखला द्यायचो आम्ही !
पहाटे चार वाजता सुरू व्हायचा तुझा कार्यक्रम,
सूर्य दादा तरी थोडा उशिराच उगवायचा,
पण तू नाही कधी बदलीस ह्या आळसाला.
आमच्या साखर झोपेत आवाज यायचे फक्त,
तुझ्या फलाट हादरवून सोडणाऱ्या भोंग्याचे.
पहाट उगवते मुंबईत तुझ्या दिनचर्येने
आणि जरी मावळला सूर्य थकून भागून,
तरी तुझी धावपळ कधी थांबलीच नाही..
शाळेतल्या दफ्तराच्या ओझ्यापासून कॉलेजच्या बोज्यापर्यंत,
तू सतत राहिलीस पाठीशी अविरत, नितांत !
सगळ्या देशाचा भार आपल्या कंबरेवर घेऊन,
तू चालत राहिलीस अविरत, व्रतस्थ..
पाहिलेस तू सारे प्रसंग, काही कटू काही मधुर,
नटलीस होतीस तूही सण वार करीत साजरे
कधी आक्रोश ही केलास तू असह्य होणाऱ्या वेदनेने,
स्तब्ध होतीस तू, काही दिवस ह्या व्यथेने.
झोडपून काढणाऱ्या पावसाचा मार ही खालास तू,
आणि शिरशिरी भरणाऱ्या थंडीत ही राबलीस तू.
रणरणत्या उन्हातही तू तापलीस आमच्यासोबत,
पण थांबली नाही तू कधी ह्या विवंचनेने.
पण आज मात्र काळ गोठलाय तुझ्या रुळावरती,
फलाट ही सूनसान आहेत आणि जिने झालेत रिकामे.
तुझ्या लोहमार्गा भोवतीचा सारा फापटपसारा,
काय माहित अचानक कुठे गायब झाला !
आज स्वप्नात आली होतीस तू माझ्या,
धावत होतो एका जिन्यावरून दुसऱ्या फलाटावर !
आठ बाराची व्ही टी लोकल चुकल्याचा ताण
तुलाही होता थोडा बहुत वक्तशीर राहण्यासाठी.
आठवण येते तुझी, अजूनही जरी दूर असलो तरी
एकच प्रश्न वारंवार, का थांबली मुंबई लोकल ?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *