सदाबहार व पु काळे

” आकाशात जेव्हा एखादा कृत्रिम उपग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर पिटाळून लावेपर्यंत सगळा संघर्ष असतो. त्याने एकदा स्वतः गती घेतली कि उरलेला प्रवास आपोआप होतो. असंच माणसाचं आहे…समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोहचलात कि आयुष्यात अनेक समस्या ती उंचीच सोडवते.”
वपुंचे हे वाक्य मला खूप आवडतं. खरंतर ह्या चार ओळींमध्ये यशाचं सूत्र दडलेले आहे. भूस्थिर कक्षेत उपग्रहाला स्थापित करण्यासाठी त्याला ३६ हजार किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. असं म्हणतात, नव्हे खरंच आहे कि पहिल्या दहा टक्के प्रवासात रॉकेट मधील ९० टक्के इंधन वापरले जाते आणि पुढील ९० टक्के प्रवासात दहा टक्के इंधनच लागते. यश मिळवणे हे काहीसे असेच असते. एक विशिष्ट उंची गाठण्यासाठी प्रचंड आटापिटा करावा लागतो, पण मानवी स्वभावाला हा उपद्व्याप नकोसा वाटतो. आणि म्हणूनच कि काय बरेचसे उपग्रह दहा टक्के प्रवास करण्याअगोदरच खाली आदळतात. यशावर बोलण्यासाठी मी काही अधिकृत व्यक्ती नाही पण यश मिळवणे बऱ्याच लोकांना का शक्य होत नाही याचे मार्मिक कारण ह्या चार ओळी मध्ये दडले आहे. बाकी आपण सारे सुज्ञ आहात शब्दांमधले आणि शब्दां पलीकडले समजण्यासाठी लागणारा विवेक तुमच्याकडे आहे आणि आणि मलाही तो लाभावा ही सदिच्छा. असं काही व पू सारखं लिहायला फार वेगळ्या पातळीवरची प्रतिभा लागते. स्वातंत्र्योत्तर आणि मोबाईल क्रांती अगोदरचा काळ फारच वेगळा होता. त्यावेळी माणूस आपल्या अंतर्गत क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करत असे आणि मोबाईल क्रांतीनंतर मात्र माणूस यंत्रांची क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. आता हेच बघा ना, हा लेख लिहिण्यासाठी मला लेखणीची गरजच भासत नाही! मी जसं बोलतोय तसं हा मोबाईल फोन लिहित जातोय, उस्फूर्तपणे, न थांबता! बोटांना काही त्रास नाही आणि त्यामुळे एवढा मोठा लेख मी कसा काय लिहिला याचे उत्तर तुम्हाला मिळालं असेल. शर्थ एवढीच आहे की हा लेख तुम्ही इथपर्यंत वाचला असावा! अन्यथा एवढ भरपूर काही आजकाल कोण वाचत नसतात. लिहिणे वाचणे हे आजकाल कालबाह्य झालंय आणि एकंदरीत असला प्रपंच कोणी करत असेल तर तो समाज-बाह्य होण्यास वेळ लागत नाही. फार कशाला आमच्या लहानपणीच एखादं मोठं पुस्तक हातात घेऊन वाचायला बसलं तरी काही लोकांना तो नजारा बघूनच धडकी भरायची. त्यांचा आपल्याकडे बघण्याचा अविर्भाव काहीसा असा असायचा की हा माणूस वेडा आहे की काय. इतकं लिहिणे आणि वाचणे आऊटडेटेड झालं होतं. आता बदलत्या पिढीची जर ही अवस्था असेल तर अशा समाजात वपु सारखे अभिजात लेखक कसे बरं निर्माण होतील!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *